धाराशिव – विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत विधानसभेमध्ये संधी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. ह्याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींच्या तसेच वरिष्ठ नेते मंडळीच्या गाठीभेटीवर जोर देताना काही इच्छुक उमेदवार दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे सुधीर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही नेतेमंडळींचा देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. यामध्ये धाराशिव च ठाकरे गटाचे मकरंद (नंदु) राजेनिंबाळकर हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. ह्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून मी कायम ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे मकरंद (नंदु भैय्या) राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
मकरंद (नंदु भैय्या) राजेनिंबाळकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा राहिला असून ते 4 वेळा नगरसेवक व सलग 7 वर्ष नगराध्यक्ष राहिले असून ते शिवसेना (उबाठा) पक्षाचे सक्रीय नेते आहेत.लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. दिलेली जबाबदारी सक्षमरित्या पार पाडत त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या विजयात मोठा हातभार लावला होता. त्यामुळे ठाकरेंची साथ सोडून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या केवळ अफवा आहेत.त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे मकरंद (नंदु) राजेनिंबाळकर यांनी सांगितले.