वाशी – 26 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी वाशी तालुक्यातील इंदापूर येथील प्रल्हाद कवडे यांच्या घराच्या दरवाजावर थाप मारली, थाप मारल्याने घरामध्ये असलेली मुलगी संतोषी जागी झाली व दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच लोखंडी रॉड ने तिच्या डोक्यात मारण्यात आले व अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेत तिच्या आईला देखील मारहाण केली व अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. ही घटना घडत असताना आरडाओरड सुरू झाल्याने शेजारी राहणाऱ्या रुक्मिणी रामचंद्र काशीद बाहेर आल्या, त्यांना देखील लोखंडी रॉडने हातावर जबर मारहाण करण्यात आली. तसेच घरातील दोन पत्र्याच्या पेट्यांतील दोन लाख रुपये, दोन तोळे नऊ ग्राम सोने, कपडे असा एकूण 2 लाख 58 हजारांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.

सदरील दरोड्याच्या तपासासाठी वाशी पोलीसांकडून सपोनी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक मागवण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाने घरातील एका मोबाईल व घराच्या हँड ड्रॉप वरील ठसे घेतले असून श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर इंदापूर तेरखेडा रोडवरील सह्याद्री हॉटेलपर्यंत जाऊन थांबले. दरोडेखोर तेथून चार चाकी वाहनातून पसार झाले. यामुळे श्वान पथक तेथेच थांबले. घटनास्थळास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात, सपोनी सावंत, इंदापूर बीट अंमलदार जाधवर यांनी पाहणी केली असून पुढील अधिक तपास सपोनी सावंत करत आहेत.
दरोड्याचा छडा लावण्याचे वाशी पोलीसांसमोर आवाहन
सोलापूर धुळे महामार्गावर देखील रात्रीच्या वेळी सतत चोरीच्या घटना घडत असतात. मागच्याच आठवड्यात नांदगाव येथील घले यांच्या घरातील एक तोळ सोने व काही रक्कम भुरट्या चोरांनी हात चालाखीने लंपास केली होती. तसेच सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी वाहने तसेच इतर सामानाच्या ट्रकांवर चढून चोरीच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. ह्या सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश येत होते, अशातच आता ही दरोड्याची घटना घडल्याने पोलीसांची डोकेदुखी वाढली असून ह्या दरोड्याचा तपास लावण्याचे मोठे आवाहन वाशी पोलीसांसमोर असणार आहे.