तुळजापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्तीचे उमेदवार आण्णासाहेब दराडे यांनी तुळजापूर मतदारसंघात आपला प्रचार दौरा अधिक तीव्र केला आहे. रविवार आणि सोमवार, या दोन दिवसांत दराडे यांनी ढेकरी, शिराढोण, अमृतवाडी, मसला खुर्द, दहिवडी, काठी, सावंतवाडी, खुंटेवाडी, वानेवाडी, सावरगाव, केमवाडी, जळकोटवाडी, वडगाव, काटी, तामलवाडी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, देवकुरुळी, धोत्री, सुरतगाव, मगर सांगवी, मांजरवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, गोंधळवाडी, कुंभारी अशा एकूण 30 गावांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

या दौऱ्यात दराडे यांनी मतदारांना घरपोच भेटून त्यांची मते मागितली आणि पुढील कार्यकाळात आमदार म्हणून काम करण्याचा दृढ विश्वास दिला. “ज्या हक्काने आज मी तुमच्याकडे मते मागायला आलो आहे, त्याच हक्काने निवडून आल्यावर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी तुमच्यासोबत असेन,” असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. दराडे यांच्या या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.