धाराशिव – पोलीस अधिकाऱ्यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
तामलवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरज शांतीलाल देवकर (वय ३५, रा. बाळे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
देवकर यांनी एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध दाखल गुन्ह्यातून त्याचे नाव वगळण्यासाठी आणि त्याला अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने धाराशिव एसीबी कडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर एसीबी ने सापळा रचत देवकर यांनी दि. 17 रोजी पंचासमक्ष ठरलेल्या रकमेपैकी पन्नास हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
धाराशिव एसीबी युनिटचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले. या कारवाईत पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, विशाल डोके, शशिकांत हजारे यांचा समावेश असून पुढील अधिक तपास सुरू असून देवकर यांच्याविरुद्ध तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.