नागरिकांच्या सेवेसाठी कर्मचारी निवासस्थाने व आरोग्य उपकेंद्रांची बांधकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
धाराशिव – ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य संस्थांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येतात. आरोग्य संस्थेत येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळाली पाहिजे हा त्यांचा हक्क आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने व आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीचे बांधकामे नागरिकांच्या सेवेसाठी तातडीने पूर्ण करावी.असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
आज 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून ई-प्रणालीद्वारे धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 6 कोटी 8 लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जागजी येथील कर्मचारी निवासस्थाने व सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,कर्मचारी निवासस्थाने व आरोग्य उपकेंद्र इमारतींचे बांधकाम कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करतांना शक्यतो ही कामे तातडीने पूर्ण करून सहा महिन्यात नागरिकांच्या सेवेत रुजू करावीत. छोटी कामे तीन महिन्यात पूर्ण करावी, बांधकामे करताना कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये. सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची करण्यात यावी. ही कामे आधुनिक पद्धतीने करावी असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तुळजापूर तालुक्यातील जागजी येथील 2 कोटी 75 लक्ष रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे,बारूळ, दहिवडी,देवसिंगा आणि धाराशिव तालुक्यातील मौजे वडगाव (सि),बावी व सारोळा येथील आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.या बांधकामावर प्रत्येकी 55 लक्ष 50 हजार रुपये खर्च येणार आहे.
या कार्यक्रमाला संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य विभागाचे संबंधित आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी मानले.