मुंबई – आज बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची घोषणा केली. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार, असे जरांगे याने जाहीर केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत संयम बाळगावा, आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असे आवाहन जरांगे यांना केले आहे.
‘एबीपी माझा’शी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्विकारली आहे. याप्रकरणी २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासा आहे.
मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकिलांची मोठी फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडणार आहे. यातून मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळणार आहे. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणे महत्वाचे आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये. सर्वोच्च न्यायालयात आपण सर्व बाबी मांडू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हे देखील वाचा – मुंबईत धडक कशी मारायची? जरांगे पाटलांनी सांगितले..
आंदोलनकर्ते, विरोधी पक्ष आणि सरकारचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एकमत आहे. आता क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कुणीही आवेशात येऊन निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.