मुंबई – एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असे अंदाज एका ओपिनियन पोलमधून समोर आले आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्ष यातून समोर आला आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एबीपी-सी व्होटर्सने सर्व्हेक्षण केले. या ओपिनियन पोलचे निष्कर्ष भाजपसह शिवसेना, अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारे आहेत.
ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा?
लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे. महाविकास आघाडी 26 ते 28 जागा मिळू शकतात. तर भाजप प्रणित एनडीएला 19 ते 21 जागा मिळू शकतात. 2 जागा इतरांना मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मविआची मतांची टक्केवारी वाढणार
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या जागांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार मतांच्या टक्केवारीबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसची टक्केवारी वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला 37 टक्के मते मिळू शकतात. इतर पक्षांच्या झोळीत 22 टक्के मते जाताना दिसत आहे.